प्रश्न १. गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा.
(अ) भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे, कारण …..
(i) कमी राष्ट्रीय उत्पन्न
(ii) प्रचंड लोकसंख्या
(iii) मोठे कुटुंब
(iv) अन्नधान्य कमतरता
उत्तर – (ii) भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे, कारण प्रचंड लोकसंख्या
(आ) ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने …………. व्यवसायावर अवलंबून आहे.
(i) प्राथमिक
(ii) द्वितीयक
(iii) तृतीयक
(iv) चतुर्थक
उत्तर – (iii) ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने तृतीयक व्यवसायावर अवलंबून आहे.
(इ) भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था …………. प्रकारची आहे.
(i) अविकसित
(iii) विकसित
(ii) विकसनशील
(iv) अतिविकसित
उत्तर – (ii) भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था विकसनशील प्रकारची अर्थव्यवस्था आहे.
प्रश्न २. खालील प्रश्नांची उत्तरेलिहा.
(अ) ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प का झाला आहे?
उत्तर –
1. ब्राझीलच्या पश्चिम भागात खनिजांचे साठे तुलनेने कमी प्रमाणात उपलब्ध आहेत.
2. ब्राझीलच्या पश्चिम भागात ॲमेझॉन नदीचे खोरे आहे. येथील सदाहरित वने, प्रदेशातील दुर्गमता इत्यादी कारणांमुळे या भागातील खनिज संपत्तीचा शोध घेणे व त्यांचा वापर करणे यांवर नैसर्गिकरीत्या बंधने पडली आहेत.
3. या प्रदेशात लोकसंख्या विरळ स्वरूपाची आहे. परिणामी, येथे खनिजांना मोठ्या प्रमाणात मागणी उपलब्ध नाही.
4. या भागात वाहतुकीच्या सोईसुविधाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. म्हणून ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प झाला आहे.
(आ) भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य व फरक कोणते?
उत्तर –
(i) भारत व ब्राझील या देशांत चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य:
1. भारत व ब्राझील या देशांतील किनारपट्टीच्या भागात मासेमारी व्यवसाय विकसित झाला आहे.
2. भारत व ब्राझील या दोन्ही देशांत खाऱ्या पाण्यातील मासेमारी केली जाते.
(ii) भारत व ब्राझील या देशांत चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील फरक:
1. भारतात ठिकठिकाणी नद्या, तळी, सरोवरे इत्यादी ठिकाणी गोड्या पाण्यातील मासेमारी केली जाते. परंतु, ब्राझीलमध्ये प्राकृतिक रचना, घनदाट जंगले, नद्यांच्या पाण्याचा वेग यांमुळे गोड्या पाण्यातील मासेमारी विकसित झालेली नाही.
2. ब्राझीलजवळ उष्ण व सागरी प्रवाह एकत्र येतात. प्रवाहांच्या संगमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्लवक वाढते. प्लवक हे माशांचे खाद्य असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मासे आढळतात. परिणामी, ब्राझीलमध्ये मासेमारी व्यवसाय विकसित झाला आहे. याउलट, भारताजवळ अशा प्रकारे सागरी प्रवाह एकत्र येत नसूनही इतर अनुकूल घटकांमुळे भारतात मासेमारी व्यवसाय विकसित झाला आहे.
प्रश्न ३. कारणे सांगा.
(अ) ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे.
उत्तर –
1. भारत जगाच्या एकूण क्षेत्रांपैकी केवळ २.४१% भूक्षेत्र व्यापतो; मात्र जगाच्या लोकसंख्येपैकी १७.५% लोकसंख्या भारतात आहे, तर ब्राझीलने जगाच्या एकूण भूभागापैकी ५.६% इतके क्षेत्र व्यापले आहे; परंतु जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ २.७८% लोकसंख्या ब्राझीलमध्ये आहे.
2. २०११ च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता ३८२ व्यक्ती प्रति चौकिमी आहे, तर ब्राझीलमधील २०१० च्या जनगणनेनुसार ब्राझीलमधील लोकसंख्येची घनता २३ व्यक्ती प्रति चौकिमी इतकी आहे.
3. याचाच अर्थ भारताची लोकसंख्येची घनता ही ब्राझीलच्या लोकसंख्येच्या घनतेपेक्षा जास्त असल्याने भारतातील प्रत्येक व्यक्तीला उपलब्ध होणारी जमीन ही ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे.
म्हणजेच, ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे.
(आ) भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे.
उत्तर –
1. मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खासगी क्षेत्रांचे सह-अस्तित्व असते.
2. भारतात व ब्राझीलमध्ये रेल्वे, विद्युतनिर्मिती, लोह व पोलाद उदयोग इत्यादी क्षेत्रांतील साधनांची मालकी व व्यवस्थापन यांवर प्रामुख्याने शासनाचे नियंत्रण आहे.
3. भारतात व ब्राझीलमध्ये बँका, विमान वाहतूक, आरोग्य, शिक्षण, दूरसंचार इत्यादी क्षेत्रांतील साधनांची मालकी व व्यवस्थापन खासगी उद्योजक व शासन यांत विभागलेले आहे. अशा प्रकारे, भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे.
प्रश्न ४. पुढील आलेखाचा अभ्यास करून त्याचे थोडक्यात विश्लेषण करा.
उत्तर –
(१) भारतात सुमारे ४८.८ टक्के लोकसंख्या प्राथमिक क्षेत्रात, २४.३ टक्के लोकसंख्या द्वितीयक क्षेत्रात आणि २६.९ टक्के लोकसंख्या तृतीयक क्षेत्रात गुंतलेली आढळते.
(२) ब्राझीलमध्ये सुमारे १० टक्के लोकसंख्या प्राथमिक क्षेत्रात, १९ टक्के लोकसंख्या द्वितीयक क्षेत्रात आणि ७१ टक्के लोकसंख्या तृतीयक क्षेत्रात गुंतलेली आढळते.
(३) भारतात एकूण राष्ट्रीय उत्पादनात प्राथमिक क्षेत्राचा वाटा १७ टक्के, द्वितीयक क्षेत्राचा वाटा २६ टक्के आणि तृतीयक क्षेत्राचा वाटा ५७ टक्के आढळतो.
(४) ब्राझीलमध्ये एकूण राष्ट्रीय उत्पादनात प्राथमिक क्षेत्राचा वाटा ५.५ टक्के, द्वितीयक क्षेत्राचा वाटा २७.५ टक्के आणि तृतीयक क्षेत्राचा वाटा ६७ टक्के आढळतो. यावरून असे दिसून येते की, भारताची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायावर अवलंबून आहे. याउलट, ब्राझीलची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने तृतीयक व्यवसायावर अवलंबून आहे.
Yash says
Very nice😍
Pragati dhabale says
Nice
Diyuu says
Very simple for learning 💯❤️
Sarika says
Thanks🌹🌹
Vaibhav vaidya says
💯💯👍👍
CANDYY.BOLTE says
Nice.👍🏻🙂