प्रश्न १. पाठात दिलेली माहिती, आकृत्या व नकाशे यांच्या आधारे तक्त्यातील माहिती भरा.
अ.क्र. | वनांचा प्रकार | गुणधर्म | भारतातील प्रदेश | ब्राझीलमधील प्रदेश |
१. | उष्ण कटिबंधीय वने | १. रुंदपर्णी सदाहरित वृक्ष | ||
२. | निम वाळवंटी काटेरी वने | १. २. | ||
३. | ‘सॅव्हाना’ | १. तुरळक झुडपांसारखी झाडे/तुरळक झुडपे व अवर्षण प्रतिकारक गवत | ||
४. | उष्ण कटिबंधीय निम पानझडी | १. मिश्र स्वरूपाच्या वनस्पती | ||
५. | गवताळ प्रदेश | १. अर्जेंटिनातील ‘पंपास’ प्रमाणे गवताळ प्रदेश |
उत्तर –
अ.क्र. | वनांचा प्रकार | गुणधर्म | भारतातील प्रदेश | ब्राझीलमधील प्रदेश |
१. | उष्ण कटिबंधीय वने | रुंदपर्णी सदाहरित वृक्ष | अंदमान आणि निकोबार बेटे, पश्चिम घाट, आसाम इत्यादी. | गियाना उच्चभूमी व ॲमेझॉन नदीचे खोरे |
२. | निम वाळवंटी काटेरी वने | (१) वनस्पतींची पाने आकाराने लहान. (२) कमी उंचीच्या वनस्पती. | गुजरात, राजस्थान. | ब्राझीलमधील ईशान्य भागातील पर्जन्यछायेचा प्रदेश शुष्क (अवर्षण चतुष्कोन) |
३. | ‘सॅव्हाना’ | १. तुरळक झुडपांसारखी झाडे/तुरळक झुडपे व अवर्षण प्रतिकारक गवत | राजस्थान मधील वाळवंटी प्रदेश. | ब्राझीलची उच्चभूमी |
४. | उष्ण कटिबंधीय निम पानझडी | १. मिश्र स्वरूपाच्या वनस्पती | पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, मध्य प्रदेश इत्यादी. | पॅराग्वे-पॅराना नद्यांच्या खोऱ्याचा प्रदेश |
५. | गवताळ प्रदेश | १. अर्जेंटिनातील ‘पंपास’ प्रमाणे गवताळ प्रदेश | हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम (तराई प्रदेश). | ब्राझीलचा अतिदक्षिणेकडील प्रदेश |
प्रश्न २. वेगळा घटक ओळखा.
(अ) ब्राझीलमधील वनप्रकार-
(i) काटेरी झुडपी वने
(ii) सदाहरित वने
(iii) हिमालयीन वने
(iv) पानझडी वन
उत्तर – ब्राझीलमधील वनप्रकार – हिमालयीन वने
(आ) भारताच्या संदर्भात-
(i) खारफुटीची वने
(ii) भूमध्य सागरी वने
(iii) काटेरी झुडपी वने
(iv) विषुववृत्तीय वने
उत्तर – भारताच्या संदर्भात – भूमध्य सागरी वने
(इ) ब्राझीलमधील वन्य प्राणी-
(i) ॲनाकोंडा
(ii) तामरिन
(iii) मकाऊ
(iv) सिंह
उत्तर – ब्राझीलमधील वन्य प्राणी – सिंह
(ई) भारतीय वनस्पती-
(i) देवदार
(ii) अंजन
(iii) ऑर्किड
(iv) वड
उत्तर – भारतीय वनस्पती – ऑर्किड
प्रश्न ३. जोड्या जुळवा.
गट अ | गट ब |
(अ) सदाहरित वने | (i) सुंद्री |
(आ) पानझडी वने | (ii) पाईन |
(इ) समुद्रकाठची वने | (iii) पाऊ ब्रासील |
(ई) हिमालयीन वने | (iv) खेजडी |
(उ) काटेरी व झुडपी वने | (v) साग |
(vi) आमर | |
(vii) साल |
उत्तर –
गट अ | गट ब |
(अ) सदाहरित वने | (iii) पाऊ ब्रासील |
(आ) पानझडी वने | (v) साग |
(इ) समुद्रकाठची वने | (i) सुंद्री |
(ई) हिमालयीन वने | (ii) पाईन |
(उ) काटेरी व झुडपी वने | (iv) खेजडी |
प्रश्न ४. थोडक्यात उत्तरेद्या.
(अ) ब्राझील व भारतातील नैसर्गिक वनप्रकारातील फरक सांगा.
उत्तर – ब्राझील व भारतातील नैसर्गिक वनप्रकारांतील फरक पुढीलप्रमाणे आहे.
(i) वर्षावने:
ब्राझील देशाच्या विषुववृत्ताजवळील उत्तर भागात वर्षभर भरपूर पाऊस व सूर्यप्रकाश पडतो. त्यामुळे ब्राझीलच्या उत्तर भागात घनदाट व सदाहरित वर्षावने आढळतात.
भारताचे स्थान विषुववृत्तापासून लांब आहे. त्यामुळे ब्राझीलमध्ये आढळणारी वर्षावने भारतात आढळत नाहीत.
(ii) हिमालयीन वने:
भारताच्या उत्तर भागात हिमालय पर्वतरांगांत अतिउंच प्रदेशांत हंगामी फुलझाडे असणारी वने, मध्यम उंचीवरील प्रदेशांत पाईन, देवदार, फर, स्प्रूस अशा सूचिपर्णी वृक्षांची वने व पायथ्यालगत मिश्र वने आढळतात.
ब्राझील देशात अतिउंच व बर्फाच्छादित पर्वत आढळत नाहीत.
त्यामुळे भारतात आढळणारी हिमालयीन वने ब्राझीलमध्ये आढळत नाहीत.
(आ) ब्राझील आणि भारतातील वन्य प्राणीजीवन व नैसर्गिक वनस्पती यांचा सहसंबंध स्पष्ट करा.
उत्तर –
1. नैसर्गिक वनस्पती हे तृणभक्षक प्राण्यांचे व पक्ष्यांचे खाद्य असते. तृणभक्षक प्राणी हे मांसभक्षक प्राण्यांचे खाद्य असते.
2. विशिष्ट प्रकारचे नैसर्गिक खादय असणाऱ्या वनस्पती ज्या प्रदेशात आढळतात, त्या प्रदेशात तृणभक्षक प्राणी व पक्षी मोठ्या संख्येने आढळतात. परिणामी, अशा प्रदेशांत मांसभक्षक प्राणी मोठ्या संख्येने आढळतात.
3. उदा., ब्राझीलच्या गवताळ प्रदेशात गवतात चरणारी विविध जातींची हरणे आढळतात व हरणांची शिकार करणारे बिबटे मोठ्या संख्येत आढळतात.
4. उदा., भारतातील गवताळ प्रदेशात विविध प्रकारचे कीटक आढळतात व या कीटकांचे भक्षण करणारे माळढोक पक्षी आढळतात.
5. सर्वसाधारणपणे ज्या प्रदेशात नैसर्गिक वनस्पतींचे प्रमाण जास्त असते, अशा प्रदेशात वन्य प्राणी व पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात.
6. उदा., ब्राझीलमधील विषुववृत्ताजवळील भागांत विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात. परिणामी या भागांत विविध प्रजातींचे प्राणी व पक्षी आढळतात.
7. ज्या प्रदेशात नैसर्गिक वनस्पतींचे प्रमाण कमी असते, अशा प्रदेशात वन्य प्राणी व पक्षी तुलनेने मर्यादित प्रमाणात आढळतात.
8. उदा., भारतातील वाळवंटात मर्यादित प्रमाणात वनस्पती आढळतात. परिणामी या भागांत मर्यादित प्रमाणात प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात.
(इ) ब्राझील व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागते?
उत्तर – ब्राझीलला व भारताला पुढील पर्यावरणीय समस्यांना तोंड दयावे लागत आहे:
1. वाढत्या लोकसंख्येच्या निवासासाठी, इंधनासाठी व स्थलांतरित शेतीसाठी दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही देशांना निर्वनीकरण समस्येला सामोरे जावे लागत आहे.
2. दोन्ही देशांतील वाढत्या नागरीकरणामुळे प्रदूषणाच्या समस्येत वाढ झाली आहे.
3. वाढते प्रदूषण, निर्वनीकरण इत्यादी कारणांमुळे दोन्ही देशांना पर्यावरणाच्या ऱ्हासाची समस्येला तोंड दयावे लागत आहे.
4. पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे दोन्ही देशांतील विविध प्रजातींच्या वनस्पती, प्राणी व पक्षी यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
(ई) ब्राझील व भारतामधील वनांचा ऱ्हास होण्याची कारणे कोणती?
उत्तर – ब्राझील व भारतामधील वनांचा र्हास होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
(i) वाढते नागरीकरण-
भारत व ब्राझील या दोन्ही देशांत औद्योगिक विकासामुळे नागरी लोकसंख्येत वाढ होत आहे.
या नागरीकरणामुळे अनेक नवीन शहरांचा उदय व विस्तार होत आहे. शहरांच्या विस्ताराबरोबर तेथील सुविधांसंदर्भातील नियोजन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. उदा. भारतामध्ये नवीन शहरांचा विस्तार होत असता, तसेच शहरातील वाहतूक मार्गांचा विकास करण्यासाठी वृक्षतोड झाली आहे.
(ii) स्थलांतरित शेती-
हा उदरनिर्वाह स्वरूपाचा शेतीप्रकार असून त्याकरता लागणारी जमीन वृक्षतोड करून किंवा जाळून मोकळी केली जाते. त्यानंतर या मोकळ्या भूखंडावर काही वर्षे शेती केली जाते. जेव्हा या जमिनीचा कस घटून उत्पादन कमी होते तेव्हा ती जागा सोडून दुसऱ्या जागी शेतीसाठी वृक्षतोड करण्यात येते.
या प्रकारच्या शेतीला ब्राझीलमध्ये ‘रोका’ म्हटले जाते, तर ईशान्य भारतात ‘झूम’ म्हटले जाते.
अशा प्रकारच्या शेती पद्धतीमुळे वारंवार जंगलतोड केल्यामुळे वनांचा र्हास होत जातो.
(उ) भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी का व्यापला आहे?
उत्तर –
1. पर्जन्यमान आणि हवामान हे वनस्पती जीवनावर परिणाम करणारे मुख्य घटक आहेत.
2. भारत हा उष्ण कटिबंधीय देश असून भारतात मान्सून प्रकारचे हवामान आहे. देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत पाऊस पडतो.
3. भारताचे एकूणच हवामान वर्षभर उष्ण असते. या नैसर्गिक स्थितीमध्ये पानझडी वृक्ष अधिक जास्त प्रकारे अनुकूलन साधतात. ज्या प्रदेशात १००० ते २००० मिमी दरम्यान पर्जन्यामान आहे. तेथे पानझडी वृक्ष आढळतात.
4. कोरड्या ऋतूत बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये, म्हणून या वनांतील वृक्ष पाने गाळतात. त्यामुळे, भारताचे हवामान आणि पर्जन्यमान यांच्याशी जुळवून घेणाऱ्या साग, बांबू, वड, पिंपळ इत्यादी पानझडी वनस्पती येथे अधिक प्रमाणात आढळतात.
याचाच अर्थ, भारतात सर्वाधिक भाग पानझडी वनांनी व्यापला आहे.
प्रश्न ५. भौगोलिक कारणेलिहा.
(अ) ब्राझीलचा उत्तरभाग घनदाट वनांनी व्यापला आहे.
उत्तर –
1. ब्राझीलच्या उत्तर भागात ॲमेझॉन नदी वाहत असून या नदीने ब्राझीलचे सुमारे दोन तृतीयांश क्षेत्र व्यापले आहे.
2. तसेच, ब्राझील देशाच्या उत्तरेकडील भागातून विषुववृत्त जाते. त्यामुळे, हवामान उष्ण असते. परिणामी, येथे वर्षभर पाऊस पडतो. या भागात अभिसरण प्रकारचा पाऊस पडतो. येथील हवामान वनस्पतींच्या वाढीसाठी अतिशय अनुकूल असते.
3. तथापि, प्रतिकूल हवामान, जास्त पर्जन्यमान, दाट वने इत्यादींमुळे मानवी वस्त्या निर्माण होण्यास मर्यादा पडतात. यामुळे, ॲमेझॉन खोऱ्याच्या अंतर्गत भागात लोकसंख्येचे वितरण कमी आढळते.
4. अशाप्रकारे, ॲमेझॉन नदी, वर्षभर पडणारा पाऊस, पाण्याची मुबलकता, पुरेसा सूर्यप्रकाश, उष्ण व दमट हवामान आणि दुर्गमतेमुळे मर्यादित प्रमाणातील मानवी हस्तक्षेप या सर्व कारणांमुळे ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट अरण्यांनी व्यापला आहे.
(आ) हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते.
उत्तर –
1. हिमालयाच्या उंच भागात तापमान अतिशय कमी असते. काही ठिकाणी तापमान ०° सेल्सियस पेक्षाही कमी आढळते. हिमालयात उंच भागात सर्वत्र बर्फाचे थर आढळतात.
2. अतिथंड हवामान व बर्फाचे थर यांमुळे हिमालयात वनस्पतींची मोठ्या प्रमाणात वाढ होत नाही.
3. उन्हाळ्यात हिमालयातील तापमान तुलनेने अधिक असते व या प्रदेशातील बर्फ वितळू लागते. त्यामुळे हिमालयात उन्हाळ्यात हंगामी फुलझाडे उगवतात. परंतु, हिवाळ्यात या वनस्पतींचा नाश होतो. अशा प्रकारे, हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ असते.
(इ) ब्राझीलमध्ये कृमी कीटकांची संख्या जास्त आहे.
उत्तर –
1. ॲमेझॉन नदीचे विस्तीर्ण खोरे आणि विषुववृत्तीय उष्ण व दमट हवामान, वर्षभर पडणारा पाऊस यांमुळे ब्राझीलच्या उत्तर भागात घनदाट वने आहेत. मुबलक पाणी, सुपीक जमीन यांमुळे येथे जमिनीलगत वाढणाऱ्या वनस्पतींची संख्याही जास्त आहे.
2. तसेच, पॅराग्वे व तिच्या उपनद्यांमुळे तयार झालेला पँटानाल हा जगातील उष्ण कटिबंधीय पाणथळ भूमींपैकी सर्वांत मोठा दलदलीचा प्रदेश आहे.
3. या प्रदेशातील प्रचंड पाऊस, उष्ण-दमट हवामान, नद्यांना वारंवार येणारे पूर, दलदलीचे प्रदेश, जमिनीलगत वाढणाऱ्या वनस्पती, घनदाट अरण्यांच्या प्रदेशात जमिनीपर्यंत सूर्यप्रकाश न पोहोचणे हे सर्व घटक कृमी कीटवकांच्या वाढीस पोषक ठरले आहेत.
म्हणूनच, ब्राझीलमध्ये कृमी कीटवकांची संख्या जास्त आहे.
(ई) भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.
उत्तर –
1. भारतातील वाढत्या लोकसंख्येच्या निवासाच्या व इंधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. भारतातील वाढत्या निर्वनीकरणामुळे प्राण्यांच्या अधिवासास धोका निर्माण झाला आहे.
2. भारतात नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे भारतातील विविध प्रकारच्या प्रदूषणांचे प्रमाण वाढले आहे. प्रदूषणामुळे प्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
3. भारतात प्राण्यांची शिकार व बेकायदेशीर तस्करी या समस्या वाढत आहेत. भारतात ‘झूम’ सारख्या स्थलांतरित शेतीसाठी मोठ्या संख्येने वृक्षतोड करून किंवा झाडे जाळून वनांचा प्रदेश मोकळा केला जात आहे. त्यामुळे भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.
(उ) भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही प्राणी व वनसंवर्धनाची गरज आहे.
उत्तर –
1. भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही वाढत्या निर्वनीकरणामुळे प्राण्यांच्या अधिवासास धोका निर्माण झाला आहे. भारताप्रमाणेच ब्राझीलमध्येही नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ब्राझीलमध्ये विविध प्रकारच्या प्रदूषणांचे प्रमाण वाढले आहे. प्रदूषणामुळे प्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
2. भारताप्रमाणेच ब्राझील देशातही प्राण्यांची शिकार व बेकायदेशीर तस्करी यांचे प्रमाणही जास्त आहे. भारतातल्या ‘झूम’ सारख्या स्थलांतरित शेती प्रमाणे ब्राझीलमध्ये ‘रोका’ या स्थलांतरित शेतीसाठी मोठ्या संख्येने वृक्षतोड करून किंवा झाडे जाळून वनांचा प्रदेश मोकळा केला जात आहे.
3. या समस्यांमुळे भारतातील वन्य प्राण्यांच्या घटत्या संख्येप्रमाणेच ब्राझीलमधील प्राण्यांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे. दोन्ही देशांत प्राण्यांच्या काही जाती दुर्मीळ होत आहेत. काही प्रजाती पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे प्राण्यांच्या प्रजातींच्या रक्षणाच्या दृष्टिकोनातून भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही प्राणी व वनसंवर्धनाची गरज आहे.
Vardhan dhakad says
10th April
Jyoti says
Very nice