स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती
१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
(1) भारतात लहान-मोठी अशी सहाशेच्या वर _____ होती.
(अ) राज्ये (ब) खेडी
(क) संस्थाने (ड) शहरे
उत्तर – (क) संस्थाने
(2) जुनागड, _____ व काश्मीर या संस्थानाचा अपवाद वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन झाली.
(अ) औंध (ब) झाशी
(क) वडोदरा (ड) हैदराबाद
उत्तर – (ड) हैदराबाद
२. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(1) जुनागड भारतात विलीन झाले.
उत्तर – जुनागड संस्थानाचा नवाब पाकिस्तानात सामील होण्याच्या विचारात होता, परंतु तेथील जनतेने त्याला विरोध केला. त्यामुळे नवाब पाकिस्तानात पळून गेला आणि १९४८ च्या फेब्रुवारी महिन्यात जुनागड भारतात विलीन झाले.
(2) भारत सरकारने निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली.‘
उत्तर – हैदराबादचा निजाम भारतात विलीन होण्यास नकार देत होता व त्याने ‘रझाकार’ संघटनेच्या मदतीने लोकांवर अत्याचार सुरू केले. सामोपचाराने तो निर्णय घेत नव्हता, म्हणून १३ सप्टेंबर १९४८ रोजी भारत सरकारने ‘ऑपरेशन पोलो’ अंतर्गत निजामाविरुद्ध कारवाई करून १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद भारतात विलीन केले.
(3) भारतात सामील होण्याच्या करारावर हरिसिंगाने स्वाक्षरी केली.
उत्तर – पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला केल्याने काश्मीर संस्थानाच्या राजा हरिसिंग याला भारताची मदत आवश्यक होती. त्यामुळे भारताकडून मदत मिळवण्यासाठी त्याने भारतात विलिनीकरणाच्या करारावर स्वाक्षरी केली. भारतीय लष्कराने काश्मीरवरील हल्ला परतवून लावला.
३. थोडक्यात उत्तरे लिहा.
(1) संस्थानांच्या विलीनीकरणातील सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान स्पष्ट करा.
उत्तर – भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी मुत्सद्दीपणे संस्थानिकांना समजावून सांगून ‘सामीलनामा’ तयार केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे बहुतांश संस्थाने भारतात विलीन झाली. जुनागड, हैदराबाद व काश्मीर ही संस्थाने वेगळ्या परिस्थितीत विलीन झाली. त्यांनी अखंड भारताच्या निर्मितीस महत्त्वपूर्ण योगदान दिले.
(2) हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वामी रामानंद तीर्थ यांचे योगदान स्पष्ट करा.
उत्तर – स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना करून लोकशाही हक्कांसाठी संघर्ष केला. त्यांनी निजामविरोधी चळवळीत नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखालील लढ्यामुळे १९४८ मध्ये हैदराबाद भारतात विलीन झाले.
Leave a Reply